बालपणी कोहलीने प्रशिक्षकांचा मारही खाल्ला होता…

0

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला आक्रमक स्वभावामुळे बालपणी प्रशिक्षकांचा मार देखील खावा लागला होता.त्याच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी या आठवणींना उजाळा दिला. कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा म्हणाले की, विराट बालपणी कोणाचेच ऐकत नसे. वरिष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकापल्ली यांच्या `ड्रिवेनः द विराट कोहली स्टोरी’ पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. कोहली लहानपणापासूनच खूप हट्टी असल्याचे यावेळी राजकुमार यांनी सांगितले. बत विराटकडून कधी कोणती चूक झाली तर त्याला राजकुमार यांचा मार ही खावा लागत असे.

विराटला मी केवळ दम देत नसे. कारण केवळ दम दिल्याने तो ऐकायचा नाही. अनेकदा मला त्याला थोबाडीत मारावं लागलं आहे., असं राजकुमार म्हणाले. कोहली बालपणापासून त्याच्या फलंदाजीबाबत खूप दक्ष असायचा. प्रतिस्पर्धी संघ कमी धावांवर गारद झाला की विराट सलामीच्या फलंदाजीसाठी हट्ट करायचा. मला बॅटिंग मिळाली नाही मग?’, असा निरागस प्रश्न तो नेहमी विचारायचा.

कोहली नेहमी मोठय़ा खेळाडूंमध्ये जाऊन खेळायचा. त्याच्या वयाचे खेळाडू त्याला बाद करण्यात अपयशी ठरायचे मग कोहलीला कंटाळा यायचा. त्यामुळे कोहली त्याच्यापेक्षा वयाने मोठय़ा खेळाडूंसोबत खेळण्याचा हट्ट करायचा. त्यावेळी कोहली फक्त दहा वर्षांचा होता, असे राजकुमार म्हणाले. टीम इंडिया 1 जूनपासून सुरू होणार्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडला रवाना झाली असून  मिनी वर्ल्डकप समजल्या जाणार्या या स्पर्धेत विराट कोहली टीम इंडियाचे नेतृत्त्व करत आहे. कोहली त्याच्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. मैदानातील आक्रमक स्वभावावरून कोहलीला टीकाही सहन कराव्या लागल्या.

Share.

About Author

Leave A Reply