विजयवाडा-अमरावती केवळ पाच मिनिटांत

0

आंध्रप्रदेशातील विजयवाडा आणि राज्याची नवी राजधानी अमरावती येत्या काळात सर्वांत गतिमान रेल्वेसेवा ‘हायपरलूप’ने जोडली जाणार असून, केवळ पाच मिनिटांत एका शहरातून दुसर्‍या शहरात पोहोचता येणार आहे. या संदर्भात आंध्र सरकारने अमेरिकन कंपनीशी करार केला आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास भारतातील पहिला हायपरलूप प्रकल्प मानला जाईल.

देशातील इतर राज्यांमध्ये मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पहाट उजळत असतानाच नवी राजधानी सर्व आधुनिक सेवा आणि सोयींनी युक्त असावी असा मानस असणार्‍या आंध्रप्रदेश सरकारने इतर राज्यांना मागे टाकत ‘हायपरलूप’ची इच्छा व्यक्त केली आहे. या वेगवान अशा रेल्वेगाडीची संकल्पना एलन मस्क यांनी सर्वप्रथम अमेरिकेत मांडली. मात्र आजपर्यंत ती कुठेही प्रत्यक्षात अस्तित्वात आलेली नाही. दरम्यान, आंध्रप्रदेश आर्थिक विकास मंडळ आणि अमेरिकास्थित हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन टेक्नॉलॉजी (एचटीटी) यांच्यामध्ये झालेल्या करारात या प्रकल्पाची निश्‍चिती करण्यात आली. हा प्रकल्प सार्वजनिक आणि खासगी भागीदारी तत्त्वावर साकारण्यात येणार असून, खर्चाबाबत मात्र काहीही जाहीर करण्यात आलेले नाही.

हायपरलूप एखाद्या ट्यूबसारखे असून त्यातून होणारी वाहतूक अत्यंत वेगाने होते. अनेक देशांमध्ये अजूनही ही व्यवस्था प्रयोग व चाचणीच्या पातळीवरच विकसित झालेली आहे. स्वित्झर्लण्ड येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची एचटीटीच्या अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा पार पडली. त्यानंतर एचटीटी आणि आंध्रप्रदेशात सामंजस्य करार करण्यात आला.

Share.

About Author

Leave A Reply