सई-ललितची बाजी झी टॉकीज कॉमेडी अ‍ॅवॉर्ड

0

कुणी निंदा, कुणी वंदा, हसवणे हाच आमचा धंदा, असं म्हणत रसिकांचे भरपूर मनोरंजन करणा-या विनोदी कलावंतांचा गौरव करणारा झी टॉकीज कॉमेडी अ‍ॅवॉर्डस सोहळा नुकताच दिमाखात संपन्न झाला. हास्यविनोदाचा जल्लोष असलेल्या या रंगतदार सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन स्वप्नील जोशी व पुष्करराज चिरपुटकर यांनी केले. या दोघांच्या भन्नाट निवेदनाने कार्यक्रमाची रंगत चांगलीच वाढवली. मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील कलाकारांच्या धमाकेदार सादरीकरणाने उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. या सोहळ्याचा आस्वाद रविवार ३० जुलैला सायं. ६.३० वा. झी टॉकीजवर घेता येईल.

या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये वाय झेड चित्रपटाने व ९ कोटी ५७ लाख या नाटकाने पुरस्कार सोहळ्यावर आपली ठसठशीत मोहोर उमटवली, तर चित्रपट विभागात ललित प्रभाकर याला सर्वोत्कृष्ट नायकाचा तर सई ताम्हणकर हिने सर्वोत्कृष्ट नायिकेचा मान मिळवला. नाटक विभागात आनंद इंगळे व सुलेखा तळवलकर यांनी बाजी मारली. तसेच पुनरुज्जीवित नाटक विभागात ‘शांतेच कार्ट चालू आहे’ नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार मिळाला. याच विभागासाठी व याच नाटकासाठी अभिनेता प्रियदर्शन जाधव व अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी पुरस्कार पटकावले.

आपल्या चतुरस्त्र अभिनयाने सिनेनाटय़सृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना या सोहळ्यात प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लोकनाटय़ाचा विशेष पुरस्कार ज्येष्ठ कलावंत वसंत अवसरीकर यांना देण्यात आला. तर वेब निर्मितीचा विशेष ज्युरी पुरस्कार भारतीय डिजिटल पार्टीला मिळाला.

Share.

About Author

Leave A Reply