खुशखबर! मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार!

0

मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पहायला जाणा-यांना आता बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन गेल्यास त्यांना कोणी आडकाठी करत असेल, तर त्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

राज्यातील विविध महानगरांमधील मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास कुठलीही बंदी नाही. मुंडे यांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून मल्टिप्लेक्स, महामार्गावरील फुडमॉल व मॉलमध्ये बाहेरील खाद्यपदार्थ खाण्यास घालण्यात येणारी बंदी आणि आतील खाद्यपदार्थांची जादा दराने होणारी विक्री, याकडे सरकारचे लक्ष वेधले होते.

मल्टिप्लेक्स चालक बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मज्जाव करतात आणि आतमध्ये त्यांच्याकडे असणा-या खाद्यपदार्थांची चढ्या दराने विक्री करतात, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. यासंबंधी कायदा करण्याची मागणीदेखील त्यांनी केली. त्यावर राज्यमंत्री चव्हाण यांनी उत्तर दिले.

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यावर कसलीही बंदी नाही. तशी मनाई कुणी करू शकत नाही. मनाई करणा-यांवर कारवाई केली जाईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. मल्टिप्लेक्समधील महागाईच्या विरोधात आंदोलन करणा-यांवरील गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

त्याचबरोबर पाण्याची बॉटल किंवा अन्य खाद्यपदार्थ यांचे दर मल्टिप्लेक्स, मॉलमध्ये वेगळे आणि बाहेर वेगळे का? असा प्रश्न मुंडेंनी विचारला. त्यावर सर्व मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमती समान ठेवल्या जातील. जागा बदलली म्हणून वस्तूची ‘एमआरपी’ बदलू शकत नाही. एकाच वस्तूची किंमत दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी असू शकत नाही, असे ते म्हणाले. तसेच केंद्र सरकारने केलेल्या कायद्याप्रमाणे १ ऑगस्टपासून एकाच वस्तूची किंमत सगळीकडे सारखी असेल, असे राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Share.

About Author

Leave A Reply