वॉलेट मनी अॅप कसं वापरायचं?

0

आपल्या देशाच्या क्षेत्रफळाचा आणि लोकसंख्येचा विचार केला तर शंभर टक्के कॅशलेस व्यवहार ही खूप दूरची बाब आहे, यात काहीच दुमत नाही. कारण आपल्याकडे आर्थिक साक्षरतेच्या नावाने आनंदच आहे. त्यातच ५०० आणि १००० रुपये मूल्याच्या नोटा बाद करून त्याजागी २००० आणि ५००च्या नवीन नोटा आणल्या. उच्च मूल्याच्या नोटा बाद करण्याचं पुढचं पाऊल कदाचित ई-बँकिंगद्वारे व्यवहार हे असू शकतं ज्याला डिजिटल पेमेण्ट म्हणतात.

एक साधा व्यवहार पाहू या. मी ३६० रुपये किमतीचा खाद्यतेलाचा डबा दुकानदाराकडून विकत घेतला. कमाल किमतीत (ज्याला इंग्रजीत MRP म्हणतात) ३०० रुपये ही त्या मालाची प्रत्यक्षातली किंमत आणि ६० रुपये कर याचा अंतर्भाव आहे, असं समजू. दुकानदार मला बिल देतो आणि मी त्याला ३६० रुपये रोख देतो. यापैकी ६० रुपये ही कराची रक्कम असल्याने ती दुकानदार सरकारकडे जमा करतो.

मात्र मी दुकानदाराकडून या व्यवहाराचं बिल घेतलं नाही तर काय होईल? या व्यवहाराची नोंद नसल्याने ते ६० रुपये दुकानदार सरकारकडे जमा करणार नाही आणि ते पैसे त्याच्याकडेच राहतील. पुन्हा एक बाब लक्षात घ्यायला हवी की, ३०० रुपये किमतीचा डबा त्याला कंपनीकडून प्रत्यक्षात २७० रुपयांना मिळतो. म्हणजे दुकानदाराचा नफा ३० अधिक ६० रुपये (चुकवलेल्या कराची रक्कम) मिळून ९० रुपये झाला. बरं मी बिल घेतलं काय किंवा न घेतलं काय, दुकानदार माझ्याकडून ३६० रुपयेच वसूल करणार आहे.

तात्पर्य अशाप्रकारे बिल न घेतल्याने सरकारकडे ६० रुपये कमी कर भरणा झाला. कल्पना करा देशात लाखो दुकानदार अशाप्रकारे किती कर बुडवत असतील? कर वसुली कमी झाली म्हणून सरकार पुन्हा अधिक कर लावणार किंवा कराची रक्कम वाढवणार. शेवटी वाढीव कराचा भार तुमच्या-आमच्यावरच येतो.

मात्र त्या डब्याची किंमत मी दुकानदाराला रोखीने न देता चेकने दिली किंवा त्याच्या बँक खात्यात थेट जमा केली किंवा डेबिट वा क्रेडिट कार्डने दिली तर ती रक्कम बँक खात्यात दिसणार. पर्यायाने वार्षिक कर भरणीचा हिशेब, ज्याला आपण रिटर्न्स म्हणतो, तो भरताना ही जमा रक्कम दाखवून त्यावर दुकानदाराला कर भरावाच लागणार.

मला डेबिट कार्ड समजत नाही. वापरायला भीती वाटते. इंटरनेट काय तेही कळत नाही. अशा उगीच सबबी आणि गैरसमजुतीने आपण सरकारचं म्हणजे देशाचं नुकसान करत असतो. कल्पना करा अशा किती ठिकाणी रोखीने व्यवहार केल्याने बिनहिशेबी पैसा निर्माण होतो. काळा पैसा स्वित्झर्लण्डला जाऊन शोधायची गरज नाही. दिवसाकाठी दोन लाखाचा गल्ला गोळा करणारा हॉटेलवाला, स्टेथेस्कोप छातीला लावला की ४०० रुपये रोख घेणारा डॉक्टर, दिवसाकाठी लाखो रुपयांचा किराणामाल विकणारा दुकानदार…. ही यादी किती मोठी होईल. बारकाईने बघितलं तर यातले बहुसंख्य रोख पैसे हे कराच्या जाळ्यातच येत नाहीत.

सध्या नोटांची एवढी टंचाई आहे की, रोख रक्कम देऊ म्हटलं तरी ते शक्य होत नाही. सहज रस्त्यावर नजर टाकली तर अनेक दुकानदारांना कार्ड स्वाइप मशीन्स बसवली आहेत. आज घडीला अनेक व्यक्तींकडे डेबिट, एटीएम किंवा क्रेडिट कार्ड आहेत, अनेकांचं कुठल्यातरी बँकेत बचत खातं आहे आणि आजकाल सर्वांकडे मोबाइल तर असतोच. या तीन गोष्टी जवळ असल्या तर रोखीची फार गरज पडत नाही.

समजा हॉटेलच्या २०० रुपयाच्या बिलासाठी मी माझं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड स्वाइप केलं की माझ्या बँक बचत खात्यातून २०० रुपये वजा होतात आणि मला एक छापील पावती तात्काळ मिळते, ज्यात अमुक हॉटेलला २०० रुपये दिले गेल्याची नोंद असते. हॉटेलवाला कार्ड यंत्रात टाकून स्वाइप करणार आणि नंतर मी फक्त चार आकडी पासवर्ड कोड माझ्या हाताने टाकला की झालं. यात काय कठीण आहे?

दुसरी पद्धत म्हणजे वॉलेट मनी. ही सुविधा पुरवणारी अनेक अॅप्स आहेत, ज्यात बँकांचे अॅप्सही आले आहेत. पेटीएमसारखे खासगी अॅपही आहेत. या वॉलेट मनीची संकल्पना एवढी सोपी आहे की, जणू काही लाखो कप्पे असलेलं एक काल्पनिक कपाट आहे, ज्यात एक कप्पा मी माझ्या नावाने आरक्षित करून ठेवला आहे. माझ्यासारखे लाखो लोक, दुकानदार, संस्था, हॉटेल्स, भाजीवाले, टॅक्सी व रिक्षाचालकांनी आपापले कप्पे आरक्षित करून ठेवले आहेत. आत हे अॅप कसं वापरायचं ते बघू या.

 1. आपल्या मोबाइलवर कोणत्याही संस्थेचं वॉलेट मनी अॅप डाऊनलोड करायचं. त्यानंतरचं काम म्हणजे त्या कप्प्यात पैसे भरायचे, ज्यासाठी अॅपच्या मुख्य स्क्रिनवर ‘Add Money’ असा पर्याय असतो.
 2. ‘Add Money’ वर क्लिक केल्यास काही प्रश्न विचारले जातात, त्याला उत्तरं द्यायची. म्हणजे तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डाचा क्रमांक, कार्ड वैधता तारीख, सीव्हीव्ही कोड (जो कार्डाच्या मागील बाजूस तीन अंकी असतो.)
 3. त्यानंतर आपल्याला बँकेकडून नोंदणी केलेल्या मोबाइलवर एक सात आकडी पासवर्ड येतो, जो पुढल्या स्क्रिनमध्ये टाइप करायचा.
 4. पुढे किती रक्कम कप्प्यात भरायची तो आकडा टाकला की झालं.
 5. तुमचं डेबिट कार्ड बचत खात्याशी निगडित असल्याने खाते क्रमांक टाकावा लागत नाही. शिवाय पासवर्ड तुमच्याच मोबाइलवर येणार. त्यामुळे दुसरं कुणी त्याचा वापर करूच शकत नाही.
 6. अशा प्रकारे आपल्या कप्प्यात जमा झालेले पैसे कुणाला द्यायचे असतील तर तेही खूप सोपं आहे. अगदी रिक्षा चालकाला ८५ रुपये द्यायचे असतील तरीही.
 7. मुख्य स्क्रिनवर PAY असा पर्याय असतो, त्यात ज्याला पैसे द्यायचे आहेत, त्याचा मोबाइल क्रमांक टाइप करायचा आणि रक्कमेचाही आकडा टाकायचा.
 8. अशा प्रकारे पेमेण्ट केलं तर तुमच्या वॉलेटमधून ८५ रुपये कमी होतील आणि रिक्षा चालकाच्या वॉलेटमध्ये जमा होतील. तुम्हाला वॉलेट मनी संस्थेकडून मोबाइलवर संदेश येतो की ८५ रुपये वजा झाले आहेत.
 9. समजा तुम्हाला वीज बिल भरायचं असेल तर त्या वीज कंपनीचा मोबाइल माहित असायची गरज नाही. कारण वीज, टेलिफोन इत्यादी कंपनींचे आयकॉन मुख्य स्क्रिनवर दिसतात. त्यावर फक्त क्लिक केलं की पुढे जी स्क्रिन येते त्यात वीज ग्राहक क्रमांक किंवा लॅण्डलाइनचं बिल भरत असू तर लॅण्डलाइन क्रमांक आणि रक्कम असे आकडे टाइप केले की झालं.
 10. अर्थात हे करण्याआधी मोबाइलवर पासवर्ड येईल, तो आधी टाकावाच लागतो. हा पासवर्ड फक्त १५ मिनिटांसाठीच वैध असतो.
 11. अशा प्रकारे छोट्या व्यवहारांसाठी पैसे आपण वॉलेट मनी सुविधेद्वारे देऊ शकतो. वॉलेटमधले पैसे संपत आले तर पुन्हा एकदा आपल्या कार्डद्वारे बचत खात्यातून भरता येतात.
 12. या सर्व जमा आणि वजा झालेल्या रकमांचा तपशील आपल्याला कळणार कसा, हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. त्याला उत्तर म्हणजे मुख्य स्क्रिनवर PASSBOOK असा पर्याय असतो. त्यावर क्लिक केल्यास हे सर्व तपशील तिथे दिसतात.
 13. थांबा. रिक्षाचालकाला ते ८५ रुपये कुठे हातात येतील, हाच तुमचा प्रश्न आहे ना? मुख्य स्क्रिनवर Send Money to Bank पर्याय असतो. त्यावर क्लिक करून रिक्षाचालक ते पैसे त्याच्या बँकेतल्या बचत खात्यात हस्तांतरीत करेल आणि ते एटीएमद्वारे काढू शकेल. लगेचच दोन दिवसांनी की दोन महिन्यांनी हा त्याचा विषय झाला.
 14. हे सर्व हाताळायला सोपं आहे. पण आपण ते समजून घेतल पाहिजे, एवढी इच्छाशक्ती हवी.
 15. अर्थात ज्या संस्थांचे मनी वॉलेट मी वापरतो आहे, तेच वॉलेट समोरच्याकडे असले पाहिजेत.
 16. तसं ते नसेल तर मग इंटरनेट बँकिंग प्रणालीचा वापर करून मी पैसे थेट रिक्षा चालकाच्या बँक खात्यात जमा करू शकतो.

संदर्भ व सौजन्य : – चंद्रशेखर ठाकूर, महाराष्ट्र टाईम्स
(लेखक ‘सीडीएसएल’च्या इन्व्हेस्टर एज्युकेशन विभागाचे निवृत्त प्रमुख आहेत.)

Share.

About Author

Leave A Reply